खुशखबर! महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा कोरोनामुक्त 

कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात २४ व्यक्तींभोवती आपला फार्स टाकलाच होता. त्यामध्ये एक मृत झाल्यामुळे २३ रूग्ण कोरोनाशी झुंज देत होते. हे सर्व २३ रूग्ण आजच्या तीन रूग्णांसह कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले.

buldhana district of maharashtra free of covid19 infections check full details
खुशखबर! महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा कोरोनामुक्त   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • तीन रूग्ण बरे झाल्याने दिला डिस्जार्ज
  • टाळ्यांच्या निनादात रुग्णांना निरोप
  • रत्नागिरीनंतर राज्यातील आणखी एक जिल्हा कोरोनामुक्त

बुलडाणा: कोरोना विषाणूने सर्वांना अस्वस्थ करून सोडले आहे. सुरूवातीच्या काळात कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांच्या यशासाठी  ‘गो.. गो.. गो.. कोरोना’ हा संदेशही धावून आला. या संदेशामुळे सकारात्मकता निर्माण होण्यास मदत झाली. कोरोना विरूद्धच्या लढ्यात प्रशासन जोरकस प्रयत्नांसह मैदानात उतरले. सर्वांनी धीर गंभीर होत या लढ्यात प्रशासनाची मदत केली.

कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात २४ व्यक्तींभोवती आपला फार्स टाकलाच होता. त्यामध्ये एक मृत झाल्यामुळे २३ रूग्ण कोरोनाशी झुंज देत होते. हे सर्व २३ रूग्ण आजच्या तीन रूग्णांसह कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले. खऱ्या अर्थाने गो कोरोना गो हा नारा, संदेश आज परिस्थितीचे सत्य प्रकट करतो. ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल आल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली आहे.

२३ रुग्ण झाले बरे 

बुलडाणा जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधित रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील तीन, मलकापूर येथील चार, सिंदखेड राजा येथील एक आणि दे.राजा येथील दोन कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये मुळचे कामठी जि. नागपूर येथील व बुलडाणा येथे असलेल्या तीन रूग्णांची आज भर पडली आहे. आज मूळचे कामठी जि. नागपूर व सद्यस्थितीती बुलडाणा येथील तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण २३ रूग्ण बरे झालेले आहे.

डॉक्टर, नर्सेसने टाळ्या वाजवून दिला निरोप 

पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीला साद घालू शकला. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले. कोरोनावर मात केलेल्या तीनही रूग्ण समाधानाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांना दाखल केल्यापासून अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोनावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे यावेळी तीनही रूग्णांनी आभार मानले.

२३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने जिल्हा कोरोनामुक्त

कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना इच्छितस्थळी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या २३ झाली आहे. जिल्ह्यात कोविड -१९ आजाराने २४ रूग्ण बाधित होते. त्यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधित रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

कोरोनामुक्ती मिळाल्यामुळे जनतेने आपली लढाई आता संपली असे समजू नये, याउलट आपली जबाबदारी वाढली आहे. तसेच काळजीसुद्धा, बाहेर गावावरून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी आता गावात आल्यावर स्वत: आरोग्य विभागाकडून तपासणी करून घ्यावी. तसेच गावातील यंत्रणेला माहिती द्यावी. त्यानंतर १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन व्हावे. यासाठी कुणालाही सांगण्याची गरज पडू नये. जिल्हा कोरोनामुक्त ठेवायचा असले, तर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी