Nana Patole: नागपूर: 'दिल्लीच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं आहे, पण दोन्ही पक्षांना आपले आमदार सांभाळता येत नाही. म्हणूनच सरकार पडेल या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे.' असं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे.
राज्यात नवं सरकार येऊन आता जवळजवळ एक महिना होत आला. मात्र अद्यापही शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपने (BJP) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) केलेला नाही. त्यामुळे आता राज्यातील विरोधी पक्षातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. याच मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. ते नागपूरमध्ये (Nagpur) बोलत होते.
'एक महिना लोटूनही सरकार स्थापन झालेले नाही. तारीख पे तारीख सुरू आहे... दिल्लीच्या सरकारच्या दबावाखाली येऊन सरकार स्थापन झालेले आहे. दोन्ही पक्षांना आपआपले आमदार सांभाळता येत नाहीये. त्यामुळे सरकार पडेल या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीए. त्यातच सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन हे सरकार पडेल अशी भीती भाजपला आहे.' असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
'सरकार पूर्ण होण्यासाठी घटनेच्या कलम 146/1 क प्रमाणे कमीत कमी बारा जणांचे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज असते. ज्या पद्धतीने हे सरकार घटनाबाह्य पद्धतीने म्हणजेच अपंगत्वाने चालत आहे. हे मी थट्टा करण्यासाठी नाही तर घटनेप्रमाणे हे सरकार चालत नसल्याने अपंग सरकार म्हटलं आहे.'
अधिक वाचा: 'कोर्टाच्या भूमिकेचं आश्चर्य वाटतंय', फडणवीस असं का म्हणाले?
'आमदार-खासदार यांची बोली लावून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, जे यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असताना संविधानिक व्यवस्था तोडून पुरोगामी ओळख पुसण्याचे काम आता केलं जात आहे.' अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
अधिक वाचा: पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य नाही - राऊत
'राज्यातली जनता ही वाऱ्यावर असताना केंद्रातील मोदी सरकार हे तुपाशी असल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. सध्या राज्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. जी गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्यामुळे झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्याचे काम आम्ही करत आहोत.' अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
'काँग्रेसचे नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसून धीर देण्याचे काम करत आहे. पण राज्यातलं सरकार ईडीच्या भरवश्यावर आलेलं असून आता ते सरकार झोपी गेलं आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादामुळे लोकशाहीत अमान्य असलेलं हे सरकार आलं आहे.' अशी टीकाही पटोलेंनी केली आहे.