तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी" नितीन गडकरींच्या विधानाने चर्चांना उधाण

Nitin Gadkari on Chandrashekhar Bawankule: भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनल्यावर त्यांचा सत्कार समारंभ नागपुरात आयोजित केलेला. या कार्यक्रमात गडकरींनी जोरदार भाषण केलं. 

Chandrashekhar Bawankule has a chance to become cm of maharashtra big statement of Nitin gadkari
"...तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी" नितीन गडकरींच्या विधानाने चर्चांना उधाण  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्षांचा नागपुरात सत्कार
  • सत्कार समारंभात नितीन गडकरी यांनी केलं मोठं विधान
  • नितीन गडकरींच्या विधानाने चर्चांना उधाण

Nitin Gadkari: राज्यात सत्तांतर झाल्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यानंतर एका पदावर एक व्यक्ती या निमानुसार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांचा आज नागपुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाषण करताना एक मोठं विधान केलं आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटलं, आपल्यासोबत काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आपल्या सर्वांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो की आपली पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या नेत्रृत्वाखाली मी काम करत होतो. ते आजारी होते... त्यांनी कधी म्हटलं नाही की, देवेंद्रला राजकारणात घ्या आणि देवेंद्रजींनाही माहिती नव्हतं. मी एकदा त्यांना विनंती केली की, तुमची प्रकृती चांगली नाही तर देवेंद्रजींना तुम्ही राजकारणात काम करण्याची संधी द्या. ते म्हणाले, माझी अडचण नाही पण तुम्ही त्याच्यासोबत बोला. त्याची इच्छा असेल तर काम करायला हरकत नाही. त्यानंतर देवेंद्रजी राजकारणात आले. वडिलांचा वारसा होता पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, अध्यक्ष, मुख्यमंत्रिपद हे स्वत:च्या कर्तुत्वाने मिळवलं. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील आमदार, खासदारांनी काळजी घेतली पाहिजे की, माझ्या मुलाला चान्स द्या असं म्हणू नये.

अधिक वाचा : "मग शिवसेना माझीय असं म्हणायचं का?" उदयनराजे असं का म्हणाले?

नितीन गडकरींनी पुढे म्हटलं, एखाद्याच्या मुलाला जनतेने म्हटलं की, तिकीट द्या तर नक्की द्या. पण त्याच्या आई-वडिलांच्या बोलण्यावरुन नका देऊ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑटोरिक्षा ड्रायव्हरपासून कामाची सुरुवात केली. बावनकुळे यांची परिस्थिती गरिबीची होती. स्वत:च्या कामाने आणि कर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघ मजबूत केला. त्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. काही फार हुशार असतात मेहनत करत नाही पण फोटोत येतात. चंद्रशेखर बावनकुळे हे मेहनती आणि संपूर्णपणे स्वत:ला कामात झोकून देणारा कार्यकर्ता आहे. ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम बावनकुळे यांनी केलं.

देवेंद्रजी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ऊर्जा खातं दिलं होतं. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळे यांनी खूप मोठं काम केलं. त्यांच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. अनेक ऊर्जा प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. बावनकुळे यांच्यात इतकं कर्तृत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. बऱ्याच गोष्टी मला माहिती आहे पण सर्व सीक्रेट सांगू शकत नाही असंही गडकरी म्हणाले. 

नितीन गडकरी म्हणाले, जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय-काय होतो.... म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देतोय असं नाहीये हा.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजेत. पण देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार होऊ शकतो.

नितीन गडकरी यांनी केलेल्या या विधानामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजप मैदानात उतरवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पुढील लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना खासदारकीसाठी उमेदवारी मिळणार की, केंद्रात इतर कुठली जबाबदारी देण्यात येईल याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी