उद्धव ठाकरे मोदी सरकारवर भडकले, पुन्हा ‘जालियनवाला बाग’ करण्याचा आरोप

नागपूर
Updated Dec 17, 2019 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी सरकारवर चांगलेच भडकले आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी निषेध केलाय.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका 

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डागली मोदी सरकारवर तोफ
  • जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी केला निषेध
  • तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा 'जालियनवाला बाग' घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. 'तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा 'जालियनवाला बाग' घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. काही काळ कामकाज झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. दुसऱ्या दिवसाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात झालेल्या पोलीस कारवाईवरून मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारनं ही आंदोलनं चिरडण्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. यामुळे ‘देशातील तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. युवाशक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. तसंच देशभरात हे आंदोलनं होत असतांनाच महाराष्ट्रात सर्वत्र शांतता असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारनं केंद्राकडे साडे पंधरा हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट केलंय. यात रक्कमेपैकी अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २२०७ रुपयांची मागणी केली आहे. तर, पूरग्रस्तांसाठी ७ हजार कोटींची मागणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही, हे स्पष्ट करायला सुद्धा मुख्यमंत्री विसरले नाहीत.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जामियामध्ये हे विरोध प्रदर्शन सुरू होतं, तेव्हा पोलिसांकडून एकही गोळी चालवली गेली नाहीय. याप्रकरणी ज्या १० जणांना अटक करण्यात आलीय, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड सापडलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून हिंसाचार घडवला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...