दिपाली चव्हाण आत्महत्येच्या सुसाईडनोट मध्ये खासदार नवनीत राणांचे नाव, 'हे' आहे कारण

deepali chavan sucide case : आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली. साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. 

deepali chavan sucide case
सुसाईडनोट मध्ये खासदार नवनीत राणांचे नाव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मला नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले
  • नवनीत राण मॅडम यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली - चव्हाण 
  • माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसरक्षक आहेत

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून (amaravati district) महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईडनोट मध्ये दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहेत याची देखील माहिती लिहून ठेवली होती. चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आता टाईम्स नाऊ मराठीच्या हाती लागली आहे.

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. पत्रात लिहिले आहे, 'सर ज्यावेळेस धुळघाट मधून माझी बदली हरिसालला झाली होती. तेव्हा मी खूप खुश होते. कारण माझ्यावर चौकशी सुरु असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. जेव्हा मला समजलं होतं की शीवकुमार सर मला DFO आहेत तेव्हा मला अजूनच आनंद झाला. सरांची काम करायची पद्धत मला आवडायची. ते माझ्याशी फार चांगले वागायचे. माझ्या रेंजची सर्व काम सगळ्यात आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे आमची रेंज पुढे जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली. साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले'. 

मला नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले

 'काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे ३ गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात. मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले'. 

नवनीत राण मॅडम यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली - चव्हाण 

दरम्यान पुढे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे की, 'जेव्हा गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मै खुद SP को बोलके तुमपर अॅट्रोसिटी लगाता हु असे म्हणाले. याबाबत माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली आहे.(दिपाली चव्हाण यांनी या सुसाईड नोट मध्ये नवनीत राणा यांचा फक्त एवढाच उल्लेख केला आहे) अॅट्रोसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शिफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही'.

याच दलदलीत मी अडकत  चालले आहे.

सुसाइड नोटमध्ये पुढे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे, 'रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत  चालले आहे'. 

माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक आहेत

'माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे. माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्याने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत आहे. त्यांचे अधिकाऱ्यांसोबतचे वागणे खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक आहेत'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी