अमरावती : एमपीएससीची (mpsc exam) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी म्हणजे ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. येत्या २ दिवसात परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी देखील परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र कोरोनाचं संकट लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (amaravati mp navaneet rana) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governer bhagatasinh koshiyari) यांना पत्र लिहिले आहे. नवनीत राणा यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रावरून विध्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल असं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाने राज्यभर थैमान घातले आहे. कित्येक जिल्ह्यात बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती वेळोवेळी बदलत चालली आहे. कालची परस्थिती आज कायम राहत नाही. त्यामुळे मागे लावलेल्या कसोट्या आज लागू पडत नाहीत. देशात रविवारी आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सार्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज कोरोनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
नवनीत राणा यांनी पुढे पत्रकात म्हटलं आहे की, पुण्यामध्ये अभ्यास करत असणारे बरेच विद्यार्थी हे कोरोना लक्षणे असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेले आहेत. किंबहुना बऱ्याच डणांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. काही मुलांना कोरोनाची लक्षणे आहेत, मात्र भीतीपोटी ते डॉक्टरकडे गेले नाहीत. परीक्षा झाल्यानंतर जाऊ असा विचार विद्यार्थी करत आहेत. ही खूप भयंकर बाब आहे. त्यामुळे राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. असं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मध्यप्रदेश आणि बिहारसारख्या राज्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षेसंदर्भात जो काही निर्णय आहे. तो त्वरित जाहीर करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल अशी विनंती देखील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, यावर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.