Bhendwal Bhavishyavani : बुलढाणा: राज्यात चांगला पाऊस पडणार का? शेतकर्यांना अच्छे दिन येणार का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आज अनेक जण उत्साहित होते. अखेर आज त्या भेंडवळची भविष्यवाणी झाली आहे. 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचेही या भविष्यवाणीत म्हटले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रधान व्यक्तीवर आर्थिक संकट येईल असेही भाकीत या भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे.
सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर आजही शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे.
भेंडवळच्या भविष्यानुसार जून आणि जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावेळी अवकाळी पाऊसही पडणार आहे म्हणून शेतकर्यांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. वार्षिक पीक परिस्थितीच्या भाकीनुसार यंदा तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल. तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त असेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.