वाशिम: शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी नोटीस आल्यानंतर आता आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (ED raids 5 institutions of Shiv Sena MP Bhavana Gawli!)
भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे.
ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सोमय्या वाशिम दौऱ्यावर आले असता भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.