डीजे वाजवण्याचा वाद; चौघांना गुंडाने दिली गेम करण्याची धमकी, नंतर चौघांनीच काढला गुंडाचा काटा

नागपूर
भरत जाधव
Updated Oct 18, 2021 | 15:14 IST

रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवण्याच्या तक्रारीवरून झालेल्या वादामुळे एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदाजीनगर परिसरात घडली.

Four Accused murder goons
चौघांना गुंडाची गेम करण्याची धमकी, नंतर त्याचाच झाला खून   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डीजे वाजवण्याच्या तक्रारीवरून झाला वाद
  • आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

नागपूर : रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवण्याच्या तक्रारीवरून झालेल्या वादामुळे एका गुंडाची हत्या झाली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदाजीनगर परिसरात घडली. विक्की दामोदर रोकडे (वय ३२,रा. अजनी रेल्वे क्वॉर्टर) असं या प्रकरणातील मृताचं नाव आहे.याप्रकरणातील आरोपींची नावे भूषण भुते, सारंग बावनकुळे (रा. दोघेही रा. भुतेश्वरनगर), क्रिष्णा मोदेकर आणि शुभम मोंढ (रा. सगळे शिवाजीनगर गेट परिसर) अशी आहेत. या सर्वांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

डीजे वाजवण्याची तक्रार 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की हा मध्य रेल्वेमध्ये चपराशी पदावर कार्यरत असल्याचे कळते. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. त्याच्यावर एका हत्येप्रकरणी, दोन प्राणघातक हल्ल्यांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत होती. तसंच ही दहशत दिवसेंदिवस वाढत होती. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर वस्तीतील एका मित्राच्या लग्नात हळदीच्या कार्यक्रमात विक्कीने डीजे लावला होता. रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत असल्याने काही तरूणांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी छापा घालून डीजे जप्त करत कारवाई केली. 

पोलिसांना दिलेली तक्रार ही भूषण भूते, सारंग बावनकुळे, क्रिष्णा मौंदेकर आणि शुभम मोंढे (रा. भूतेश्‍वरनगर) यांनी केल्याचा संशय विक्कीला होता. त्याची खदखद विक्कीच्या मनात होती. त्यामुळे त्याने त्या चारही युवकांना काही दिवसांतच ‘गेम’ करेल, अशी धमकी दिली होती, असं सांगितले जाते. त्यामुळे आरोपींनी त्याचाच काटा काढण्याचे ठरवलं. आरोपींनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकट्याला गाठले. त्यांनी धारदार शस्त्रांनी विक्कीवर सपासप वार केले. तसंच सिमेंटचे झाकन उचलून विक्कीचा चेहरा ठेचला. यात विक्कीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी