अकोला : राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू विरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले होते.त्यात शहरातल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 156/3 अंतर्गत 405,409,420,468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Guardian Minister Bachchu Kadu granted bail)
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात ही तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.
वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असून पालकमंत्री बच्चू कडू यांनी या आरोपाच खंडण केले आहे.
मी दोषी असेल तर वंचितच्या कोणत्याही नेत्यासमोर मी माझे हात कलम करील असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे. आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कडून ऍड. बी.के.गांधी यांनी अकोला जिल्हा सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला.
या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून जामीन मंजूर करण्यात आला असून पुढील सुनवाई 9 मे रोजी होणार आहे.