'मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला 

नागपूर
रोहित गोळे
Updated Dec 15, 2019 | 21:32 IST

Uddhav Thackeray: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाला चांगलंच सुनावलं.

i do not work for the opposition says chief minister uddhav thackeray
'मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला   |  फोटो सौजन्य: ANI

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला काही टोमणेही लगावले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ हजार कोटींच्या पॅकेजची आवश्यकता आहे असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की, 'मी विरोधी पक्षासाठी नाही जनतेसाठी काम करतो.' दरम्यान, उद्यापासून (सोमवार) पाच दिवसाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चहापाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण नव्या सरकारच्या  पहिल्याच चहापाण्यावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील अनेक नेते हजर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिलं. २३ हजार कोटींची शेतकऱ्यांना गरज असल्याची बोलत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की, 'काही जणांना सतत बोलण्याची सवय असते. त्यांनी हवं ते बोलू द्या, मी आणि माझं मंत्रिमंडळ हे राज्यातील जनतेंसाठी काम करतं. त्यामुळे आम्ही जनतेला बांधिल आहोत. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीस यांना टोला लगावला. 

याचविषयी उद्धव ठाकरे पुढे असंही म्हणाले की, 'शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी यासाठी चांगला निर्णय घेतला जाईल. पण आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचं आहे.' 

याच वेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर फार भाष्य केलं नाही. 'शिवसेनेने आधीच त्याविषयी आपली भूमिका मांडलेली आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या विषयाबाबत फारसं भाष्य केलं नाही. मात्र, याच विषयावरुन विरोधक सभागृहात गोंधळ घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी