वाशिम : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आल्याची पहिली प्रतिक्रिया अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या वन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी व्यक्त केली आहे. माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संजय राठोड यांनी आज केला आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड पहिल्यांदा माध्यमांसमोर आले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असे ठाम मत संजय राठोड यांनी आज व्यक्त केले.
पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असे पोहरादेवीचे दर्शनासाठी आलेल्या संजय राठोड यांनी सांगितलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.
मी कुठेही गायब नव्हतो. आज पोहरादेवीच्या पवित्र भूमीत दर्शन घेऊन मी माझं काम सुरु करणार आहे, असेही राठोड यांनी सांगितले. माझ्यावर अनेक लोकांचं प्रेम आहे. सर्वांना सोबत घेऊन मी आतापर्यंत काम केलं आहे. एका घटनेमुळे तुम्ही मला चुकीचं ठरवू नका. चौकशीतून खरं काय आहे ते समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.
बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या मुलीचा पुण्यातील भाड्याच्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.. इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्ससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या. त्यानंतर भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यातच पूजा चव्हाण आणि मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. या बंजारा भाषेत संभाषण होते. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणाची पुणे पोलीस चौकशी करत असून या प्रकरणात ६ फेब्रुवारी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात एक पूजा अरूण राठोड नावाच्या २२ वर्षीय मुलीने गर्भपात केला होता. ती हीच पूजा राठोड तर नाही ना संदर्भात संशय व्यक्त केला जात आहे.