Maharashtra Political crisis: शिवसेनेच्या दोन आमदारांची घरवापसी; महाराष्ट्रात परतताच केला गौप्यस्फोट

Ghar vapasi of two Shiv Sena MLA's: शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे दोन आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतले असून त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

MLA Nitin Deshmukh and Eknath Shinde
शिवसेनेच्या दोन आमदारांची घरवापसी; महाराष्ट्रात परतताच केला गौप्यस्फोट 

नागपूर : महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला असतानाच त्यापैकी शिवसेनेचे दोन आमदारांची घरवापसी (Ghar Vapasi of Shiv Sena MLA's) झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे दोन आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. महाराष्ट्रात परतलेल्या या आमदारांपैकी नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले आमदार नितीन देशमुख? 

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे सुरतहून महाराष्ट्रात परतले आहेत. नागपूर येथे त्यांना प्रसारमाध्यमांनी या बंडाबाबत विचारले असता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमदार नितीन देशमुख म्हणाले, "मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी हॉटेलमधून रात्री ३ वाजता बाहेर पडलो. माझ्या मागे १००-२०० पोलीस होते. या पोलिसांनी मला उचलून रुग्णालयात दाखल केलं आणि असं दाखवलं की, मला ह्रदयविकाराचा झटका आला. माझा घातपात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. या मावळ्याच्या तब्येतीवर गुजरातचे पोलीस वार करु शकत नाहीत. माझी तब्येत व्यवस्थित आहे. मला गुजरातमधील पोलिसांनी जबरदस्ती उचलून रुग्णालयात नेलं. पण मला कुठल्याही प्रकारचा ह्रदयविकाराचा झटका आला नव्हता. ह्रदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्यांचा हेतू चुकीचा होता. मला २०-२५ लोकांनी पकडून जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचं षडयंत्र त्या लोकांचं होतं असंही आमदार नितीन दशमुख यांनी म्हटलं आहे. 

कोण आहेत नितीन देशमुख? 

नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेनेचे आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीनंतर नितीन देशमुख हे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत येथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत इतरही आमदार उपस्थित होते. मात्र, आपल्याला सुरत येथे नेण्यामागचं बंड हे कारण असल्याचं माहिती नव्हतं असंही नितीन देशमुख यांनी म्हटलं. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीने अकोला पोलिसांतही मदतीसाठी धाव घेतली होती आणि आपल्या पतीचा संपर्क होत नसल्याची तक्रार केली होती. पण आता नितीन देशमुख पुन्हा महाराष्ट्रात परतले असून आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचा दावा केला आहे. 

तर उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा सुरतहून महाराष्ट्रात परतले आहेत. कैलास पाटील यांनी मोठ्या शिताफिने सुरत येथून निसटून मुंबई गाठली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी