अमरावती: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी (३० डिसेंबर) झाला. आमदार बच्चू कडू यांना या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून स्थान देण्यात आलं. राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपला दणका दिला आहे.
नवनिर्वाचित राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसीलदार कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी बच्चू कडू यांनी दोन नायब दहसीलदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्याने निरीक्षण अधिकारी सपना भोवते यांच्या निलंबनाचे आदेश बच्चू कडू यांनी दिले. तर रेशन कार्ड देण्यास दिरंगाई केल्याने नायब दहसीलदार (पुरववठा) प्रमोद काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही यावेळी बच्चू कडू यांनी दिले आहेत.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पहिल्याच दिवशी सरकारी कार्यालयाला अचानक भेट देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. बच्चू कडू यांनी आतापर्यंत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. आता राज्यमंत्रिपदाची शपथ घेताच बच्चू कडू यांनी आपलं कार्य तसेच सुरु ठेवल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचं राज्यात सकार स्थापन झालं आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी मुंबईत पार पडला. यावेळी शिवसेनेने आपल्या कोट्यातून आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद दिलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता लवकरच खातेवाटपही केलं जाणार आहे.