Mahavikas Aghadi government crossed limits of cruelty : नागपूर : महाविकास आघाडी सरकारने क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. पण हे पठण होऊ नये म्हणून राणा दाम्पत्याला जी वागणूक देण्यात आली ती धक्कादायक आहे. राणा दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती सराईत गुन्हेगाराला पण दिली जात नाही अशा स्वरुपाची होती; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राणा दाम्पत्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा जाहीर केली म्हणून देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. कोर्टात हा आरोप टिकला नाही. पोलीस कोर्टात आरोप योग्य ठरविण्यासाठी एकही ठोस पुरावा देऊ शकले नाही. पण गंभीर आरोप ठेवून राणा दाम्पत्याला पोलिसांनी वाईट वागणूक दिली. पोलिसांनी हे वर्तन सरकारच्या आदेशामुळे केले. महाविकास आघाडी सरकारने क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ मे २०२२ रोजी जाहीर सभा घेऊन काहींच्या तोंडावरचा मास्क उतरविण्याची भाषा केली. यावर चांगले आहे... प्रत्येकाच्या तोंडावरचे मास्क काढले पाहिजे... असे सूचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
याआधी काल शनिवार ७ मे २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत खासदार नवनीत राणा यांची भेट घेतली. स्पाँडिलायटिसचा (मणक्यांचा आजार) त्रास होत असल्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा त्रास तुरुंगात असताना बळावला, अशी माहिती नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी मीडियाला दिली. राणा पती पत्नी या दोघांना भेटून आणि त्यांची विचारपूस करून देवेंद्र फडणवीस आज (रविवार ८ मे २०२२) नागपूरला परतले. नागपूरमध्ये विमानतळावर मीडिया प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी राणा दाम्पत्याला महाविकास आघाडी सरकारच्या आदेशावरून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली.