नागपूर : जम्मू काश्मीरमध्ये सीमेजवळच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले. शहीद भूषण सतई हे नागपुरातील काटोल येथील निवासी असून त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. यावेळी विमानतळावर भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एन.सी.सी. कामठीचे कर्नल व बायर लेफ्टनन कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंत कुमार पांडे उपस्थित होते.
शहीद भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर कामठी येथील संरक्षण विभागाच्या हॉस्पिटल परिसरात विशेष मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहीद भूषण सतई हे सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर मराठा बटालियनमध्ये रुजू झाले. गेल्या एक वर्षापासून त्यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीर येथे होती. शहीद सतई फैलपुरा काटोल येथे राहत असून त्यांच्यासोबत वडील रमेश धोंडुजी सतई, आई सौ. सरिता सतई, लहान भाऊ लेखनदास सतई आणि बहिण कुमारी सरिता सतई असा परिवार आहे.
ऐन दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने भ्याड हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय सैन्यावर गोळीबार केला. तसेच जम्मू-काश्मीरमधील सामान्य नागरिकांवरही गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकरच्या बंकर उद्वस्त केले. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत जवळपास ११ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.