मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भरारी पथकाची कारवाई, कारमधून एक कोटी रुपयांची रोकड जप्त

विधानसभा निवडणूक २०१९: विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. 

nagpur election commission seized 1 crore rupees car maharashtra polls vidhansabha nivadnuk 2019
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एक कोटीची रोकड जप्त  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • नागपुरात १ कोटी १ लाखांची रोकड जप्त
  • पाचपावली परिसरातून ७६ लाखांची रोकड 
  • सीताबर्डी परिसरातून २५ लाखांची रोकड जप्त
  • निवडणूक भरारी पथक, पोलिसांची कारवाई 

नागपूर: विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होत असल्याचं लक्षात घेऊन निवडणूक आयोगातर्फे विशेष भरारी पथक नेमण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या याच पथकाने नागपुरात कारवाई करुन एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. नागपुरातील पाचपावली आणि सीताबर्डी परिसरात ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक पोलीस आणि निवडणूक आयोगाचं भरारी पथकातर्फे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत असते. अशाच प्रकारची तपासणी करत असताना नागपुरात तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका कारमधून ७६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर नागपुरातील सीताबर्डी परिसरातील गणेश टेकडी मंदिराजवळून एका कारमधून २५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाचं भरारी पथक आणि स्थानिक पोलिसांनी वाहनांमधून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ज्या वाहनांमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे त्या वाहनधारकांना गाडीतील पैसे कसले आहेत आणि कुठे घेऊन चालले आहेत या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण देता आलं नाही आणि त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. 

नागपूर पोलिसांनी ही सर्व रोकड ताब्यात घेतली असून या संदर्भात अधिक तपास सुरु आहे. ही रक्कम कुठल्या राजकीय पक्षाची किंवा नेत्याची होती का? या संदर्भातही पोलिसांकडून तपास सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी