Facebook LIVE करताना भीषण अपघात, एसयूव्हीचा चुरा, दोघांचा मृत्यू

नागपूर
Updated Jun 17, 2019 | 21:21 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मोबाइल फोननं पुन्हा एकदा दोघांचा जीव घेतलाय. नागपूरात कार चालवत असतांना फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय.

Car Accident
नागपुरात फेसबुक लाईव्ह करणाऱ्या कारचा भीषण अपघात, २ मृत्यू (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Representative Image

नागपूर: मोबाईल फोनचा वापर करताना तो सांभाळूनच करायला हवा. अनेकदा मोबाईल फोनचा चुकीचा वापर करून अपघात होण्याच्या शक्यता असते. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीय. कार चालवतांना फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या एसयूव्ही कारचा पूर्णपणे चुरा झाला.

ड्रायव्हरनं एका गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार एका झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि इतर सहा जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. काटोल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नरेंद्र पिवल यांनी सोमवारी पीटीआयला सांगितलं की, घटना नागपूर-काटोल रस्त्यावर रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेत कारच्या ड्रायव्हरसह नऊ जण बसलेले होते.

पिवल यांनी पुढे घटनेबद्दल माहिती दिली की, विश्वकर्मा नगरचे दोघं भाऊ पुंकेश (२७ वर्ष) आणि संकेत पाटील (२५ वर्ष) यांच्या डोक्यावर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या कार प्रवासाचं ते लोक लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. पुंकेशच्या फेसबुक अकाऊंटवर ते लाईव्ह करत होते. ३७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कार पुसला गावापासून निघाली. कार चालवत असलेला पुंकेशच फेसबुक लाईव्ह करत होता. समोरच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार तीन वेळा पलटी खात रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात एसयूव्हीचा चुरा झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, आपघातात जखमी झालेल्यांची ओळख अंकित डोमाजी राऊत (२५), प्रवण शील (२१), अंबुजा साहू (२१), मलय बिस्वास (२१), अजिंक्य गुडामवर (२३) आणि राकेश डोंगरवार (२४) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.

फेसबुक लाईव्ह दरम्यान यापूर्वीही अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. एव्हढंच नव्हे तर फेसबुक लाईव्ह करत अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. गेल्यावर्षी दिल्लीत एका व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली होती आणि विशेष लक्ष द्यायची बाब म्हणजे यादरम्यान २३०० हून अधिक लोकं ते फेसबुक लाईव्ह बघत होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी