नागपूर : कार आणि ऑटोरिक्षा यांच्यात डॅश लागल्याच्या शुल्लक कारणावरुन नागपुरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मकोकाचा आरोपी असलेला शेखू हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शेखू याचा भाऊ सरोज खान याची हत्या झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सरोज खान हा शंकरनगर चौकात पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्यावेळी तेथे झालेल्या वादानंतर आरोपींनी सरोज खान याची दगडाने ठेचून हत्या केली आहे.
नागपूरचे पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज खान हा बजाजनगर येथून लक्ष्मीनगरला जात होता. जिमसाठी तो इथे आला होता. आपल्या घराकडे जात असताना पेट्रोल पंपावर तो थांबला होता आणि त्यावेळी त्याची हत्या झाली.
हे पण वाचा : Nagpur Police : नागपूर पोलिसांनी पकडली हायटेक चोर टोळी, वापरायची वॉकीटॉकी, स्पोर्ट्स कार
प्राथमिक माहितीनुसार, सरोज खान याची गाडी आणि एक ऑटो रिक्षा यांच्यात डॅश लागण्यावरुन वाद झाला होता. या वादातून सरोज खान याची हत्या करण्यात आली असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. आरोपींपैकी काही आरोपींनी मास्क परिधान केला होता. एकूण पाच ते सहा आरोपी होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
ज्यावेळी ऑटो चालकाला कारने कट मारला त्यावेळी हे सर्व आरोपी रिक्षात होते. पेट्रोल पंपाजवळ ही घटना झाली होती आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर सरोजची हत्या झाली. आरोपींनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीचा डिव्हीआर घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
शंकरनगर चौकातून जात असताना ऑटो रिक्षामध्ये काही लोक बसले होते त्या ऑटो रिक्षाला एका कारची डॅश लागली या कारणावरून वादा झाला. नंतर आटोतील पाच ते सहा जणांनी कारमध्ये असलेल्या सरोज याच्यावर हल्ला चढविला. त्या ठिकाणी असलेले गट्टू हातात घेऊन त्याची ठेचून हत्या करण्यात आली. सरोज खान अस मृतकाच नाव आहे. पेट्रोल पंपाच्या परिसरात हा सगळा प्रकार घडल्यामुळे तो सीसीटीव्हीमध्ये कैद होईल आणि आपण पकडले जाऊ या धाकाने आरोपींनी त्याठिकाणी असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून सोबत घेऊन गेले.
या हत्येचं कारण प्राथमिकदृष्ट्या डॅश लागण्यावरून घडलेल्या घटनेतून झालं असल्याचं पुढे येत असलं तरी यामागे जुनं वैमनस्य आहे का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.