'आज काहीही घडू शकतं', अजित पवारांचं मोठं वक्तव्य 

नागपूर
रोहित गोळे
Updated Dec 21, 2019 | 12:23 IST

Ajit Pawar Big Statement on Farmer's Loan Waiver: आज काहीही घडू शकतं असं वक्तव्य करत अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले आहेत. 

'आज काहीही घडू शकतं', अजित पवारांचं मोठं वक्तव्य 
ncp leader ajit pawar big statement on farmer's loan waiver  |  फोटो सौजन्य: ANI

नागपूर: राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा (शनिवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शेतकरी कर्जमाफीविषयी एखादी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वत: मोठं वक्तव्य केलं आहे. कर्जमाफीबाबत आज घोषणा होणार नाही? असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना केला त्यावेळी ते असं म्हणाले की, 'कर्जमाफीची घोषणा होणार नाही असं कोण म्हणतं?' असं म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे शेतकरी कर्जमाफीबाबत स्पष्ट संकेतच दिले आहेत. 'हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे याबाबत चांगला निर्णय होऊ शकतो असं मला वाटतं.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले. 

अजित पवार यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते असं म्हणाले की, 'मी मंत्रिमंडळाचा भाग नाही किंवा शासनाचा घटकही नाही. पण सरकार स्थापनेच्या आधीच तीनही पक्ष शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळणं गरजेचं आहे अशी मागणी करत होतं. म्हणूनच मला असं वाटतं की, आज शेतकऱ्यांबाबत काही तरी चांगला निर्णय होईल. असं माझं मन मला सांगतं आहे.' 

सुरुवातीलाच अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की, 'आज काहीही घडू शकतं. कर्जमाफीची घोषणा होणार नाही असं कोण म्हणालं?' त्यांच्या या वक्तव्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे त्यांनी लागलीच दुसरं वक्तव्य असं केलं की, 'कर्जमाफीचा निर्णय होईल असं देखील कोण म्हणतं?' असं म्हणत अजित पवारांनी सगळ्यांना बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. नव्या मंत्रिमंडळचा विस्तार हे वर्ष संपण्याच्या आधीच होणार असल्याचं देखील यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळव विस्तार पार पडेल असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अशावेळी राज्यातील जनतेसाठी नवं सरकार काही तरी मोठा निर्णय नक्कीच घेऊ शकतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काही मोठी घोषणा करणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी