अमरावती, यवतमाळमध्ये करोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन नाही, आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

Maharashtra Coronavirus updates: आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत.

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

Coronavirus in Maharashtra: अमरावती (Amravati), यवतमाळ (Yavatmal), सातारा (Satara) आणि पुणे (Pune) अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का? या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.

पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर

राज्यातील विविध भागांत दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावतीमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार दर आठवड्यातील शनिवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी