नागपूर : राज्य (State) अशांत करण्याचे प्रयत्न सुरू असून धार्मिक (Religious) तेढ निर्माण करणाऱ्या संघटना, व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिला. वळसे-पाटील हे नागपूर (Nagpur) येथील पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलत होते. धार्मिक वादातून महाराष्ट्र (Maharashtra) अशांत करण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाने पोलिसांना दिले आहेत.
भोंग्यांचा परिणाम तपासण्याचे आदेश!
सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कालच नाशिक पोलिसांनी नवे निर्देश जारी केले. संपूर्ण राज्यात असा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. यासंदर्भात आज पोलीस महासंचालक पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर आपण पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करू व नंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असंदेखील गृहमंत्री यावेळी म्हणालेत. दरम्यान भोंग्यावर काही निर्णय घेतल्यानं दोन्ही बाजूंवर काय परिणाम होईल, हे तपासण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले. भोंग्यांबाबत निर्णय घेण्यापुर्वी या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो. तसेच, राज्यात घडलेल्या काही हिंसाचाराच्या घटनांबाबत आयबी, रॉ या संस्थांशीही चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. हा संपूर्ण आढावा घेऊन राज्यातील परिस्थिती हाताळली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
अमरावतीत विघातक शक्ती जास्त
अमरावतीत नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले. अमरावतीत समाजविघातक शक्ती जास्त सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं तर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोप वळसे पाटील यांनी केला.
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवल्याबद्दलही दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण केले जात आहे, असा थेट आरोप वळसे पाटील यांनी केला. तसेच, किरीट सोमय्या यांना सुरक्षा पुरवण्यावरूनही त्यांनी टीका केली. केंद्र सरकारकडून दोषींना सुरक्षा पुरवली जात आहे. अर्थात हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असेही ते म्हणाले.