संजय राठोडांचे शक्तिप्रदर्शन पडले महागात; महंतांसह अनेकांना कोरोनाची लागण

नागपूर
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 14:31 IST

Pohoradevi Mahant's corona report positive : राठोड यांच्या शक्तिप्रदशनाच्या दरम्यान हजारो कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने २२ फेब्रुवारी रोजी तपासणी केली

Pohoradevi Mahant's corona  report positive
संजय राठोडांचे शक्तिप्रदर्शन पडले महागात  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता
  • पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली
  • राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता

वाशिम : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमली होती. दरम्यान आता येथील एका महंत कबीरदास यांच्यासह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह, आढळल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर गावातील इतर ३ जणांसह एकूण ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते, त्यामुळं कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता

दरम्यान वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तिप्रदशनाच्या दरम्यान हजारो कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने २२ फेब्रुवारी रोजी तपासणी केली होती. दरम्यान, आता संपूर्ण गावाची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे जवळपास १५ दिवसांनी समोर आले होते. यावेळी संजय राठोड यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं आणि त्यांनी पोहरादेवी गडावरच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. दरम्यान त्यांनी पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी असल्याच देखील म्हटलं होत. चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. असा आरोप देखील यावेळी संजय राठोड यांनी केला होता. यावेळी त्यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती.

राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता

वनमंत्री संजय राठोड हे पोहोरादेवीला येणार असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते. पोलिसांना न जुमानता समर्थकांनी मोठी गर्दी केली. राठोडांचे हजारो समर्थक मंदिर परिसरात दाखल झाले होते. जिल्हा प्रशासनानं फक्त ५० जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती. मात्र हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक पोहरादेवी गडावर उपस्थित होते.

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुत्रांची माहिती

दरम्यान संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान संजय राठोड यांचे हजारो कार्यकर्ते पोहोरादेवी गडावर दाखल झाले असल्यामुळे अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी