बुलडाणा : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता बुलडाणा जिल्ह्यातून (Buldhana district) धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या सख्या वहिनीला आणि पुतणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत दोन्ही माय-लेकी गंभीररित्या होरपळ्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra Crime news)
बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड येथील मंगलाबाई परिहार यांच्या पतीचे गेल्या पाच महिन्यापूर्वी निधन झाले. मंगलाबाई आपल्या दोन मुलींसह गावाजवळ असलेल्या त्यांच्या शेतामध्ये राहतात. मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता.
हे पण वाचा : 6 वर्षीय चिमुकल्यावर लोखंडी मशीन पडली; पिंपरी चिंचवडमधील घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV
सख्या दिराने संपत्तीच्या लालसे पोटी आपली मोठी वहिनी सह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यावर औरंगाबादला उपचारासाठी हलविले आहे.
२ जुलै रोजी रात्री आरोपी समाधान रामसिंग परिहार याने कट रचून, तिघी मायलेकी घरामध्ये झोपलेल्या असताना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली, याची भनक लागताच तिघी मायलेकींनी आटापिटा करत कसा बसा घरातून पळ काढला. मात्र बाहेर येताच समाधान रामसिंग परीहार याने दोघी मायलेकीच्या अंगावर, पाठीवरील पंपाने पेट्रोल शिंपडून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये मंगलाबाई परिहार तसेच पूनम परिहार या दोघी मायलेकी जळून गंभीर जखमी झाल्या असून, ज्ञानेश्वरी परिहार या छोट्या मुलीने तिथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. जखमी मायलेकींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांच्यावर औरंगाबादला उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपी समाधान परिहारवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मंगलाबाई परिहार यांच्या नातेवाईकांनी केलीय. तर पोलिसांनी सुद्धा आरोपी समाधान परिहार वर जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडालीय.