यवतमाळ : शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हे पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणी अडचणीत सापडले होते. या प्रकरणात मंत्री पद गेलेले संजय राठोड परत मंत्रिमंडळात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलीस अजून तपास करत आहेत. दरम्यान राठोडांना क्लीन चीट मिळावी यासाठी मंहत आग्रही आहेत. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणी क्लीन चीट देण्यात यावी या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे (Pune Police) विनंती केली होती.
त्यानंतर राठोड पुन्हा मंत्रीमंडळात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर संजय राठोड यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
"माझ्या मंत्रिमंडळ वापसीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्णय घेतील. पण संधी मिळाली तर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन", असं सूचक विधान संजय राठोड यांनी केलं आहे. तसेच "मी समाजासाठी काम करतोय. पुढेही करत राहीन", असंदेखील राठोड म्हणाले.
पुजा चव्हाण प्रकरणात विरोधी पक्ष जास्त आक्रमक झाल्याने त्यांना गेल्यावर्षी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच पूजा हिचा मृत्यू हा आत्महत्या (Suicide) किंवा अपघाती मृत्यू झालाय, असा रिपोर्ट पुणे पोलिसांनी दिला आहे. बंजारा समाजाचे महंत आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान पुणे पोलिसांकडून मिळालेल्या कागदपत्रानुसार संबंधित तरुणीचा मृत्यू हा अपघाती किंवा आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे, असा दावा पुणे पोलिसांची भेट घेतलेल्या बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने केला आहे. तसेच राठोड यांना याप्रकरणी क्लीन चीट द्या, अशी मागणी देखील या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळमध्ये पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज,जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचा समावेश होता.
"माझ्यावर आरोप झाले होते. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही हे मी वारंवार सांगत होतो. संबंधित प्रकरणात मला क्लीन चिट मिळाल्याचे प्रसारमाध्यमातून कळाले. मात्र माझ्या हाती त्याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. ती आल्यावर या विषयी सविस्तर बोलेन. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी आणि माझे कुटुंब व्यथित झालो. मी स्वतःहून योग्य चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता. भाजप-सेनेच्या ताणलेल्या संबंधात माझा आणि विमुक्त भटक्या समाजाचा बळीचा बकरा झाला. महंतांना समाजाचे झालेले नुकसान पहावलं जात नाही. माझ्या राजीनाम्यानंतर समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे महंत या विषयावर सातत्याने भटी घेत आहेत आणि पाठपुरावा करत आहेत", असं संजय राठोड म्हणाले.
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्याच्या वानवडी परिसरातील इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या मुलीच्या आत्महत्येनंतर ती टिकटॉक स्टार होती, अशी माहिती समोर आली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याच्या वृत्तावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. फडणवीसांच्या या मागणीनंतर सोशय मीडियावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आलं.