Tipu Sultan's atrocities on Hindus cannot be a matter of national pride says Devendra Fadanvis : नागपूर : टिपू सुलतान याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. तो देशगौरव होऊ शकत नाही; असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. टिपू सुलतान याचे नाव मुंबई महापालिकेच्या हद्दीतील एका मैदानाला देण्याच्या निर्णयाचा फडणवीस यांनी विरोध केला. हा निर्णय रद्द व्हावा अशी मागणी त्यांनी केली. ते नागपूर येथे बोलत होते. प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत देशाची अधिकाधिक प्रगती व्हावी अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
किरीट सोमय्या यांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. भारतात माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे. सामान्य नागरिकाला सरकारी कार्यालयात जाण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करुन किरीट सोमय्या सरकारी कार्यालयात गेले आणि तिथल्या एका खुर्चीवर बसून माहितीच्या अधिकारात विशिष्ट सरकारी माहिती बघत होते. हे सुरू असताना एका व्यक्तीने त्यांचा फोटो काढला. हा फोटो काढत असतानाचे फूटेज कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. फोटो काढणाऱ्यानेच तक्रार दिली आहे. जर सरकारी कार्यालय हे आपल्या बापाचे आहे असे समजून कोणी वागत असेल तसेच तक्रार करणे आणि सोमय्या यांना नोटीस पाठवणे असे करत असेल तर हा चोऱ्या लपवण्याचा उद्योग आहे. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही; असे फडणवीस म्हणाले.