Ramdas Athawale : नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा सहावा उमेदवार निवडून येईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच आज शिवसेनेचा वर्धापनदिन आहे, त्यानिमित्ताने शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यावे असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.
नागपूरमध्ये आल्यावर आठवले म्हणाले की, केंद्र सरकारची अग्निवीर योजना बेरोजगारी दूर करण्याच्या चांगल्या उद्दिष्टाने आखण्यात आली होती. मात्र त्यासंदर्भात तरुणाईमध्ये नाराजी दिसून येत आहे. सरकार या योजनेत आणखी काही चांगले बदल करत आहे. संसदेच्या आगामी सत्रात त्यासंदर्भात चर्चा होईल असे आठवले म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार हमखास जिंकून येईल, त्या संदर्भात आम्हाला शंका नाही असेही आठवले म्हणाले. तसेच आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यांना माझा आवाहन आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी भीमशक्ती व शिवशक्तीच्या एकत्रीकरणाचा स्वप्न पाहिले होते, तेव्हा तसे प्रयत्नही झाले होते. आता ही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून आमच्या सोबत यावे. फडणवीसांसह अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करावा. नाहीतर आमचे कार्य सुरूच आहे. २०२४ मध्ये आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेमध्ये विजय मिळवू अशी आमची तयारी असल्याचेही आठवले म्हणाले.