वर्धा: हिंगणघाट (Hinganghat) शहरात चक्क गटाराच्या पाण्यात (sewer water) भाजीविक्रेता भाजी (vegetable) धुवून त्याची विक्री करत असल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशाप्रकारचं कृत्य करुन भाजी विक्रेता हा नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास आणि राजरोसपणे खेळत असल्याचं आता उघड झालं आहे. या व्हिडिओमधील घटना हिंगणघाट शहरातील मनसे चौक येथील आहे.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन काय कारवाई करणार? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. नाहीतर नागरिकांना भाजीपाला खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
हिंगणघाट शहरात ही घटना कॅमेरात कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, एक भाजीवाला गटारातील पाण्यामध्ये भाजी धूत आहे.
अधिक वाचा: भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार, कारण एकले तर....
तेव्हा शहरातील नागरिकांनी भाजी खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी आणि कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या गल्ली-बोळ्यात भाजी विक्रेते असतात. त्यांच्यावरच विश्वास ठेवून नागरिक देखील निसंकोचपणे भाजी खरेदी करतात. पण आता जी घटना समोर आली आहे त्या घटनेने हिंगणघाट शहराला हादरवून टाकलं आहे.
शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते आपल्याला दिसून येतात. मात्र, हे विक्रेते आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळतच आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने संबंधित भाजी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
अधिक वाचा: Food Combination: फणस खाल्ल्यानंतर या गोष्टींचे चुकूनही करू नका सेवन; आरोग्याचे होईल मोठे नुकसान
अद्यापही येथील नागरिक संबंधितांवर योग्य त्या कारवाईची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे हिंगणघाट प्रशासन कुठपर्यंत जनतेच्या हितासाठी प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत अनेकदा असे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत देखील अशा घटनांचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये कोणतीही ठोस कारवाई झाली असल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे काही भाजी विक्रेते अत्यंत गलिच्छपणे भाजीपाला हाताळत नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं पाहायला मिळतं.