मुंबई: निवडणुकीचा निकाल लागून आता पाच दिवस उलटून गेले आहेत मात्र अद्यापही सत्ता स्थापन झालेली नाहीये. शिवसेना-भाजप-मित्र पक्षांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यातच दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचत आपलं संख्याबळ वाढवलं जात आहे. आता चंद्रपुरच्या अपक्ष आमदाराने सुद्धा भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. "महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वावर मला पूर्ण विश्वास असून त्यांच्या नेत्रृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारला माझा बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो" असं पत्रही आमदार किशोर जोगरेवार यांनी दिलं आहे.
किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी भाजपचे उमेदवार नानाजी सितारामजी शामकुळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी ७२६६१ मतांनी विजय मिळवला. त्यानंतर आता भाजप उमेदवाराचा पराभव करणाऱ्या किशोर जोरगेवार यांनी भाजपलाच पाठिंबा दिला आहे.
या निवडणुकीत भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे त्यानंतर सहा आमदारांनी भाजपला समर्थन दिलं आणि आता किशोर जोलगेवार यांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिलाय. यामुळे भाजपचं संख्याबळ आता १०५+७= ११२ इतके झाले आहे.