राहुल गांधींनी दिली मोदींना खिसेकापूची उपमा... 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खिसेकापूची उपमा दिली आहे. 

 vidhansabha election 2019 rahul gandhi yavatmal narendra modi  news in marathi
राहुल गांधींनी दिली मोदींना खिसेकापूची उपमा...   |  फोटो सौजन्य: फेसबुक

यवतमाळ, वणी:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भाचा दौरा केला. यावेळी यवतमाळच्या वणीमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खिसेकापूची उपमा दिली. खिसेकापू कसा तुमच्या खिशातील पैसे काढण्यासाठी इतरत्र तुमचे लक्ष भटकवतो आणि हळुच खिसा कापतो. तसेच मुख्य मुद्यांकडून लक्ष दुसरीकडे नेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या खिशातील पैशांवर डल्ला मारला आहे. 

राहुल गांधी यांनी १३ ऑक्टोबरला महाराष्ट्रात आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यावेळी त्यांनी औसा, धारावी आणि चांदवली येथे सभा घेतल्या होत्या. आज त्यांनी यवतमाळ येथील वणी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी कधी चंद्राबद्दल तुम्हांला सांगतील, कधी काश्मीरचे ३७० कलम कसे रद्द केले हे सांगतील, तर कधी जीम कॉर्बेट पार्कमध्ये फिल्म तयार करतील, पण देशातील प्रमुख मुद्दे आहेत त्यातबाबत ते काही बोलणार नाही. तुमच्या मनातील दुःखबद्दल, देशातील बेरोजगारीवर, आर्थिक मुद्द्यांवर ते बोलणार नाही, तुमचे लक्ष विचलीत करण्याचे काम करून मत मागताहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. 

तुम्हांला सांगितले होते की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार. झाले का असा सवाल उपस्थितांना राहुल गांधी यांनी केला. हा पैसा कोणाला जातो, मेहूल चोक्सी, विजय मल्ला, नीरव मोदी यांना जातो. कॉर्पोरेट टॅक्स नुकताच नरेंद्र मोदी माफ केला. यात १ लाख २५ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले, शेतकऱ्यांचा, गरिबांचा पैसा हा उद्योगपतींना जातो आहे, असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

राहुल गांधी केवळ दोन दिवस महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. त्यातील आज शेवटचा दिवस होता. आता यापुढे आणखी चार दिवस अजून प्रचाराला शिल्लक आहेत. त्यामुळे अजून ते प्रचार महाराष्ट्रात कुठे करतील का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर बँकॉकला गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर ११ तारखेला ते पुन्हा भारतात आले त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये त्यांच्या केसच्या सुनावणीला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी