'अखंड भारत'वर आमचा विश्वास, एक दिवस कराची भारताचा भाग असेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर
Updated Nov 21, 2020 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेकडून मिठाई दुकानाच्या मालकाला दुकानाचे नाव पाकिस्तानी शहराचे असल्याने त्या नावातून कराची हा शब्द काढून टाकण्यास सांगितले.

 We believe in 'Undivided India' - Devendra Fadanavis
एक दिवस कराची भारताचा भाग असेल - देवेंद्र फडणवीस   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे
  • शिवसेना नेत्याकडून आंदोलनानंतर संजय राऊत यांनी ही पक्षाची “अधिकृत भूमिका” नसल्याचे स्पष्ट केले
  • कराची स्वीट्स आणि कराची बेकरी मुंबईत ६० वर्षांपासून आहेत

नागपूर : महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने मिठाईच्या दुकानातील मालकाला दुकानाचे नाव पाकिस्तानी शहर असल्याने त्या नावातून 'कराची' हा शब्द काढून टाकण्यास सांगितले, यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, ‘अखंड भारत’ वर आमचा विश्वास आहे. मुंबईत सदर घटना घडल्यानंतर फडणवीस यांनी पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य केले.

एक दिवस कराची हा भारताचा भाग असेल

फडणवीस पुढे म्हणाले की, एक दिवस कराची हा भारताचा भाग असेल. 'अखंड भारत' (अविभाजित भारत) यावर आमचा विश्वास आहे आणि एक दिवस कराची भारताचा भाग होईल असा आमचा विश्वास आहे. गुरुवारी, शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील प्रतिष्ठित कराची मिठाईच्या मालकाला दुकानाचे नाव बदलून भारतीय किंवा मराठी नाव देण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी ही पक्षाची “अधिकृत भूमिका” नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले, "कराची स्वीट्स आणि कराची बेकरी मुंबईत ६० वर्षांपासून आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. आता त्यांचे नाव बदलण्यात अर्थ नाही ... ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. "

देशात लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर लव्ह जिहाद हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, 'हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे.'

ते म्हणाले, "देशात लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळमध्येही भाजपाची सत्ता नसतानाही हे स्वीकारले गेले आहे." फडणवीस पुढे, "जेव्हा अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा कायदे करणे ही सरकारची जबाबदारी बनते." काही भाजपा शासित राज्यांनी तथाकथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत.

राजनाथ सिंह म्हणाले, POK वर पाकिस्तानचा अवैध ताबा 

ट्वीटरवर राजनाथ सिंह म्हणाले- 'गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे आणि गिलगिट-बाल्टिस्तान हा POKमधील भारताचा अविभाज्य भाग आहे.' संरक्षणमंत्री यापूर्वी म्हणाले होते की, मोदी सरकार जम्मू-काश्मीरमध्ये विकासकामांच्या माध्यमातून इतका बदल करेल की पीओकेचे लोक भारताचा भाग होण्याची मागणी करतील. यापूर्वी संसदेतही पीओके हा भारताचा एक भाग आहे असा ठराव संमत केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी