Mahavikas Aghadi : नागपूर : राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी राज्यात महाविकास आघाडी तुटली आहे असे कुठल्याही नेत्याने जाहीर केलेले नाही. आगामी निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढणार का यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मंत्रिमंडळ स्थापन होण्यात एवढा वेळ का लागत आहे असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत लढली होती. नंतर मुख्यमंत्रिपदावरून फारकत घेत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबर घरोबा करून महाविकास आघाडीचे सरकार स्थाप केले. त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंड केले आणि ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. असे असले तरी अद्याप महाविकास आघाडी तुटली किंवा विसर्जित झाली असे कुठल्याही घटकपक्षाच्या नेत्याने जाहीर केलेले नाही. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
संसदेत नवीन स्टेटमेंट काढण्यात आले आहे. या स्टेटमेंटमुळे सभागृहाच्या बाहेर शांततेने आपले मत प्रदर्शित करण्याच्या किंवा निदर्शने करण्याच्या अधिकारावर बंदी आणली आहे. या गोष्टी सहन होणार नाहीत. pic.twitter.com/52tfERJBKI — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 15, 2022
पवार म्हणाले की राज्यात सरकार स्थापन होऊन १५ दिवस उलटले परंतु सध्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासन सांभाळत आहेत. मंत्रिमंडळ स्थापन होण्यास एवढा वेळ का लागत आहे हे कळायला मार्ग नाही. नवे सरकार महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रद्द करत आहे ही चांगली बाब नाही असेही पवार म्हणाले.
मागील १०-१२ दिवस राज्यात दोनजण सरकार चालवत आहेत आणि मंत्रिमंडळाची निर्मिती अद्याप झालेली नाही. इतके दिवस लागणे हे योग्य नाही. — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 15, 2022
शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. यावर पवार म्हणाले की प्रत्येक राजकीय पक्षाला योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे ती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही पवार म्हणाले. चीनने आपली सीमा ओलांडली आहे आणि याबाबत सरकारने काहीच माहिती दिलेली नाही यावर कुठलेच राजकारण होता कामा नये असेही पवार म्हणाले.