पाणी काढताना ४५ फूट खोल विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

नागपूर
Updated Jun 12, 2019 | 09:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Maharashtra Drought: महाराष्ट्रातील विविध भागांत पाण्याची भीषण परिस्थिती निर्णाण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यातच आता विहिरीतून पाणी काढताना खाली पडून एका महिलेचा मृत्यू

yavatmal drought water scarcity
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

यवतमाळ: यंदाच्या वर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. काही भागांत पाण्याची समस्या इतकी भीषण आहे की, नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र, याच दरम्यान विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यात असलेल्या माळेगाव येथे राहणाऱ्या विमल राठोड या विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीत पाणी अतिशय कमी होतं आणि ही विहिर तब्बल ४५ फूट खोलही होती. विहिरीतून पाणी काढत असताना विमल राठोड यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. खाली कोसळल्याने विमल राठोड यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. माळेगावात सोमवारी ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि मृतक विमल यांच्यावर अंत्यसंस्कार केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल राठोड या पाण्याच्या शोधात विहिरीवर पोहोचल्या. विहिर ४५ फूट खोल होती आणि पाणी खूपच कमी होतं. त्यामुळे त्यांनी विहिरीत उतरुन पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान विमल यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. या घटनेत विमल राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. 

विमल राठोड यांच्या मृत्यू नंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आंदोलन केलं. मृतक महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिकाही आंदोलकांनी घेतली होती. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन रस्त्यावर आले आणि रास्तारोको सुद्धा केला.

रिपोर्ट्सनुसार, ग्रामस्थांची संतप्त भूमिका पाहून बीडीओ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं बीडीओंनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं. तसेच पोलिसांनीही ग्रामस्थांची समजूत काढली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी