मुंबई : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील (Bhandara District General Hospital) शिशू केअर युनिटला रात्रीच्या सुमारास अचानक आग (Fire at Sick Newborn Care Unit) लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. तर आरोग्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटना प्रकरणात मोठी आणि धक्कादायक घटना उघडकीस (RTI reveals shocking information) आली आहे.
माहिती अधिकारात असे समोर आले आहे की, २०१८ पासून रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नव्हती. भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी २०१८ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात आग नियंत्रण यंत्रणा उपलब्धच नसल्याचं म्हटलं होतं.
२४/१०/२०१८ रोजी दिलेल्या या उत्तरात प्रशासनाने म्हटलं होतं, फायर सेफ्टी हायड्रन्ट्स रुग्णालयात उपलब्ध नाही, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम रुग्णालयात उपलब्ध नाही, स्मोक अलार्म रुग्णालयात उपलब्ध नाही, तर फायर Extinguisher काही उपलब्ध आहेत तर काही उपलब्ध नाहीत.
Fire Hydrant - उपलब्ध नाही
Fire Sprinklers - उपलब्ध नाही
Smoke Alarm - उपलब्ध नाही
Fire Extinguisher - कधी भरले होते याची माहिती उपलब्ध नाही
Fire Escape Ladder, Fire Escape Routes: उपलब्ध नाही
धक्कादायक म्हणजे, ही माहिती प्रशासनाने २०१८ रोजी दिली होती आणि त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी जुलै २०२० रोजी पुन्हा याबाबत विचारणा केली असता परिस्थिती जैसे थे असल्याचं समोर आलं. Fire Safety करिता अंदाजपत्रक व आराखडे प्रशासकीय मान्यता व निधी करिता वरिष्ठांना सादर केलेले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासोबत बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश दिले आहेत.
रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना एनसीपीसीआर यांनी नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने त्यांना ४८ तासांत या दुर्घटनेप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.
भंडारा येथे आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राज्य शासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.