भंडारा : भंडाऱ्यातील (Bhandara) जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (९ जानेवारी २०२१) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत (Fire at Hospital) १० नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भंडाऱ्यात दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली तसेच पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
भंडारा जिल्ह्यातील भोजापूर जवळील सोनझारी येथील गीता बेहरे यांची मुलगी या घटनेत दगावली. बेहरे कुटुंबीय मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या मुलीचे जन्मत:च वजन अत्यंत कमी होते त्यामुळे तिला उपचारासाठी भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तेथे तिच्यावर उपचार सुरू होते आणि प्रकृतीतही सुधारणा होत होती. मात्र, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीच्या बेहरे कुटुंबाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. भंडाऱ्यातील भोजापूर येथे पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "जी दुर्घटना घडली ती नेमकी कशी घडली हे आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. मी पीडित कुटुंबाला आता भेटलो त्यावेळी हात जोडून उभा राहण्याखेरीज माझ्याकडे दुसरे कोणतेही शब्द नव्हते. कुटुंबाचे सांत्वन करता येईल असे शब्द माझ्याकडे नाहीयेत."
या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. आधी अहवाल आल्यानंतर दुर्लक्ष केल्याचंही तपासण्यात येईल. गेलं वर्षभर आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. कोरोना संकटाचा सामना करताना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं नाही ना? याची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट लवकरात लवकर करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचाही समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भंडाऱ्यातील रुग्णालयात लागलेली आग आणि बालकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.