"कोरोनाचे जंतू सापडले असते तर फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते", शिवसेनेच्या 'या' आमदाराची जीभ घसरली

नागपूर
Updated Apr 18, 2021 | 16:25 IST

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातचं कोंबून टाकले असते असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

थोडं पण कामाचं

  • पुनावालांना सांगितलं जातंय की महाराष्ट्राला वॅक्सिन देऊ नका – गायकवाड
  • बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळला दयायला वॅक्सिन आहेत
  • माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार

बुलडाणा - शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (shivasena mla sanjay gaikwad) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीीका करताना जीभ घसरली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या (devendra fadanvis) तोंडातचं कोंबून टाकले असते असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर भाजप देखील आक्रमक झाली असल्याचे समोर आले आहे. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता भाजपकडून होत आहे.

नेमकं काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

“महाराष्ट्रातील भाजपच्या लोकांचे नीच राजकारण आम्ही महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहत आहोत. आज हा कोरोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही, किंवा कोरोना फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला होत नाही. तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्मातील लोकांना होत आहे. आणि अशा परस्थितीत भाजपने हे विसरू नये की त्यांच्या १०५ आमदारांना महाराष्ट्रातील लोकांनी मतदान केलं आहे. तसेच २० खासदार देखील महाराष्ट्राने दिले आहेत. आणि अशा वेळेला केंद्राकडून राज्यातील ज्या कंपन्या रेमडीसिवीरच्या इंजेक्शनचे प्रॉडक्शन करतात त्यांना सांगितलं जात आहे की महाराष्ट्राला देऊ नका”

पुनावालांना सांगितलं जातंय की महाराष्ट्राला वॅक्सिन देऊ नका – गायकवाड

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, पुनावालांना महाराष्ट्राला वॅक्सिन देऊ नका असं सांगितलं जात आहे. केन्द्राकडे ऑक्सिजन देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही. गुजरातला दीड दीड लाखाचं इंजेक्शन दिले जात आहे. ५० हजार इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिले जाते. अशा प्रकारचे नीच राजकारण या देशात आणि जगात कोणीच केले नाही. जे याठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीसचे लोकं  करत आहेत.  

बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळला दयायला वॅक्सिन आहेत

बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळला दयायला वॅक्सीन आहे, इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का, की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे का, अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीसला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता, जर हा फडणवीस मुख्यमंत्री असता तर ह्या ****ने काय केल असत..? असं देखील गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार

पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे माणूस जगला पाहिजे नंतर तुमचे राजकारण आहे, अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, कोण मतदान करेल तुम्हाला ? असा सवाल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. त्यांनी भाजपला राजकारण करू नका लोकांची मदत करा असा सल्ला दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी