'उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे', राणांना ठाकरेंबद्दल एवढा द्वेष का?

नागपूर
Updated Nov 18, 2022 | 12:30 IST

Ravi Rana vs Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली आहे. पाहा रवी राणा नेमकं काय म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • आमदार रवी राणांची जीभ घसरली
  • उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका
  • उद्धव ठाकरे, राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ravi Rana: अमरावती: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकरांबाबत पुन्हा एकदा टीकात्मक विधान केल्याने विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. असं असताना याच मुद्द्यावरुन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मात्र उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे' असं वादग्रस्त विधान रवी राणांनी केलं आहे. राणांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना वि. राणा असा वाद रंगण्याची शक्यता आहे. (uddhav thackeray should die by drowning himself why does ravi rana hate thackeray so much)  

'राहुल गांधी वादग्रस्त विधान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात त्यामुळे त्या दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे.' अशी रवी राणा म्हणाले

अधिक वाचा: 'तर आता सरकारच्या दारातच आमचे मुडदे पडतील', रविकांत तुपकर आक्रमक

पाहा रवी राणा यावेळी नेमकं काय म्हणाले:

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचं शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं. उद्धव ठाकरे देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी यांचे समर्थन करतात. उद्धव ठाकरे यांनी खरं तर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे'

'राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. त्यामुळे दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ही माझी मागणी आहे. राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु.' अशी जहरी टीका रवी राणांनी केली आहे.

राणा पती-पत्नींचा ठाकरेंवर एवढा राग का?

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात थेट आघाडीच उघडली होती. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण यावरुन राणा पती-पत्नींनी उद्धव ठाकरेंना बरंच टार्गेट केलं होतं. 

हनुमान चालीसा पठण आणि त्यावरुन झालेल्या वादामुळे तत्कालीन ठाकरे सरकारने राणा पती-पत्नींना थेट तुरुंगात पाठवलं होतं. एवढंच नव्हे तर या दोघांनाही तब्बल 8 दिवसात जेलमध्ये काढावे लागले होते. या सगळ्याचा राग राणा पती-पत्नी हे वारंवार उद्धव ठाकरेंवर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा: Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी बाळासाहेंबांना अभिवादन करतात का ? भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल

त्यामुळेच राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या विधाननंतर रवी राणांनी सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानाचं अजिबात समर्थन केलेलं नाही.

आपण सावरकर प्रेमीच असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार  परिषदेत जाहीरपणे म्हटलं आहे. फक्त किमान समान कार्यक्रम ठरवून आपण सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राहुल गांधींचं सावरकरांबाबतचं वक्तव्य चुकीचंच आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

मात्र, तरीही रवी राणा हे उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रवी राणांच्या या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना नेते हे शांतच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे

खरं तर, शिवसेना आणि शिवसैनिक हे आपल्या विरोधकांना कधीही सहजासहजी सोडून देत नाहीत. अशावेळी रवी राणांनी जी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका केलीय त्याला शिवसेना कसं उत्तर देतेय याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी