Shirdi Sai Baba : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे (Bageshwer Dham)प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री(Dhirendra Shasri) यांनी आता साईबाबांविषयी (Sai Baba)वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी यांनी जबलपूरमध्ये (Jabalpur)श्री साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत केले आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला (Shirdi Sai Baba) असून धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या प्रति बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वी शंकराचार्य स्वरूपानंद यांनी अशाच प्रकारे साईंच्या विरोधात वक्तव्य केलं होतं, मात्र धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर साई भक्तांनी मात्र साईबाबा आमचे दैवत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जबलपूरमध्ये सुरु असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आपल्या धर्माच्या शंकराचार्य यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेलं नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामुळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे शिर्डी येथील ग्रामस्थांनी संतप्त होत धीरेंद्र शास्त्रीना जोरदार प्रत्युतर दिले आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात.
साईबाबा देव आहेत की, नाही यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धीरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले होतं आणि त्यानंतर आता साईबाबा बद्दल याच धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने साईभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या आहेत. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे.