Malegaon 27 Corporators Join NCP : मालेगाव : मालेगाव (Malegaon) येथील काँग्रेस पक्षाला (Congress party) राष्ट्रवादी पक्षानं (Nationalist Party) एक मोठं भगदाड पाडलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह (Mayors) तब्बल 27 नगरसेवकांनी (Corporators) काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राज्यात एकीकडे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असे असले तरीही या तीनही पक्ष आपआपली ताकद वाढवताना दिसत आहेत. कारण काँग्रेसचे मालेगाव महापालिकेतील तब्बल 27 नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश घेताच अजित पवार यांनी नगरसेवकांचा क्लास घेतला. दरम्यान मागील नगरपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष भाजपला भारी पडले. तर सत्तेतील राष्ट्रवादी पक्ष इतर दोन्ही पक्षांच्या पुढे दिसला. नगरपंचायतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी परत एकदा जोरदार तयारी करत आपली ताकद वाढू लागला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना मालेगावमधील नगरसेवकांना पक्षात घेतंल आहे. मालेगावमधील सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
याआधी माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढेच नव्हे तर, रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडं खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना उभे करण्याचे काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसे काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीतदेखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला तो अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकाऱ्यांना देतो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम आपण करू असेदेखील उपमुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ग्वाही देताना अजित पवारांनी नगरसेवकांचे कान टोचले आहेत. आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका. कायद्याचे, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारीही घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलो आहे, गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपलेच आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत, असं म्हणून कामाकडे दुर्लक्ष करू नका.
आम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेने खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्या. आता तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये मात्र आता नाराजी दिसून येत आहे.