मालेगाव : कोरोना आटोक्यात येऊन शहरात एकही रुग्ण नसतांना कोट्यवधी रुपये खर्च करून आरटीपीसीआर लॅब उभारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. विशेष म्हणजे लॅब उभारणीच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच ठेकेदाराला ६० टक्के रक्कम अॅडव्हान्स देण्यात आली आहे. याविषयीचा आरोप विरोधी पक्षाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
डिग्नेटींच्या आरोपानुसार, कोरोना महामार पिकमध्ये असताना मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट झाले होते. त्यावेळी हजारो नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. शहरात दररोज वाढणारी रुग्णसंख्या प्रचंड होती. या रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट येण्याला तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे त्यावेळी सरकारने शहरात आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार नाशिकच्या एका कंपनीला ठेका देखील देण्यात आला होता. मात्र त्यावेळी ठेकेदाराने काम सुरू केले नाही.
परंतु गेल्या काही महिन्यापासून कोरोना पूर्णतः आटोक्यात आला आहे. सध्या एकही रुग्ण येथे नाही. असे असतांना आरटीपीसीआर लॅबचे काम आता सुरू करण्यात आले आहे. गरज नसताना लॅबचा अट्टहास कशाला? असा प्रश्न विरोध पक्षाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी यांनी उपस्थित केला आहे.