लवकर सरकार स्थापनं करणं गरजेचं, पेच लवकरच सुटणार: मुख्यमंत्री

नाशिक
पूजा विचारे
Updated Nov 04, 2019 | 10:14 IST

लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Devendra Fadnavis
लवकर सरकार स्थापनं करणं गरजेचं,पेच लवकरच सुटणार: मुख्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
  • ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते- मुख्यमंत्री
  • या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अकोल्याच्या दौऱ्यावर गेलेत. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर निकाल लागून नऊ दिवस झालेत. पण अद्यापही राज्यात कोणत्याही पक्षानं सत्तास्थापन केली नाही. शिवसेना भाजपला राज्यातल्या मतदारांनी महायुतीला मतदान केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मंत्रिपदांच्या वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. राज्याला अद्याप नव्या सरकारची आणि मुख्यमंत्र्याची प्रतिक्षा आहे. सत्तास्थापनेवरून अजूनही दोन्ही पक्षात गदारोळ सुरूच आहेत. त्यातच आता लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अकोल्याच्या दौऱ्यावर गेलेत. 

 

ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल असं मला वाटतंय, शेवटी सर्वांना राज्याच्या हितासाठी काम करायचं आहे, असं म्हणत राज्यात सध्या शेतकऱ्यांवर संकट आहे. या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधनं असतात, सध्या जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

 

 

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यातल्या लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमध्ये सुमारे 6 शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.

 

 

सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ऑक्टोबरच्या अवकाळी पावसानं झालं आहे. पण, शेतकर्‍यांनी अजिबात चिंता करू नये. राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या आपत्तीला ओला दुष्काळ समजून शेतकर्‍यांना संपूर्ण मदत दिली जाईल. शेतकर्‍यांना कुठल्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, हेही सुनिश्चित केले जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

 

 

6 नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावेत, त्यासाठी गावा-गावांत शिबिरं आयोजित करा. कृषी विद्यापीठांनी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून आवश्यक सर्व ती मदत करावी. तसंच पीकविम्याची मदत मिळण्यासाठी गावांतच अर्ज भरून घ्यावे, सरकारी यंत्रणेनं विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वयाची भूमिका वठवावी. निधीची कुठलीही कमतरता राज्य सरकारच्या वतीने भासू दिली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

 

 

योग्य व्यक्तींना लाभ देण्यासाठी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावे लागले, तरी चालेल, पण एकही शेतकरी मदतीविना राहता कामा नये. प्रत्येकाला मदत मिळेल, यासाठी जोरकस आणि मिशन मोडवर प्रयत्न करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्यात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी