Malegaon General Hospital : मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सामान्य रुग्णालयात (Malegaon Hospital) रुग्णाच्या नातेवाईकांनी (Relatives ) धिंगाणा घालून तोडफोड (vandalized) केल्याची घटना घडली. रुग्णांच्या नातेवाईकांनी धिंगाणा घातल्याने डॉक्टर (Doctor), नर्स (Nurse) आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोन ते तीन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये एक वृद्ध महिला अॅडमिट आहे. तिला भेटण्यासाठी तिचे नातेवाईक आले होते. आयसीयूमध्ये जास्त गर्दी करू नका, असं सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितलं. आपल्या सुचना का दिली याचा राग येत एका तरुणाने आरडाओरडा करून धिंगाणा घातला. त्यानंतर इतरांनी देखील त्याला साथ देऊन हॉस्पिटलमधील खुर्च्या, झाडांच्या कुंड्या आदींची मोडतोड केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी घटनास्थळी धाव घेतली व धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व भीतीचं वातावरण आहे.