फटाके न फोडताच साजरी करा दिवाळी; उत्तर महाराष्ट्रात फटाके फोडण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण?

नाशिक
भरत जाधव
Updated Oct 19, 2021 | 16:44 IST

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार.

Firecrackers banned in North Maharashtra
उत्तर महाराष्ट्रात फटाके फोडण्यास बंदी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार
  • हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव
  • नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी

नाशिक : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. कोरोनामुळे ठप्प पडलेली बाजारपेठ पु्न्हा खुली झाली आहे. फटाक्याची दुकाने जागोजागी लागतील. परंतु विभागीय आयुक्तांनी केलेल्या फटाक्याची बंदीमुळे सामान्यांसह दुकानादाराचींही दिवाळी विना आवाज करणारी असणार आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार असून कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिकमध्ये येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून कुणालाही फटाके फोडता येणार नाही. तसेच कंटेन्मेट झोन परिसरात फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगरमधील महापालिका, नगरपालिकांसाठीदेखील ठराव मंजुरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

फटाक्यांना का केली बंदी

विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शहरी भागात अधिक प्रमाणात फटाक्यांचा वापर केला जातो. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करण्यात आला आहे.

काय आहे आयुक्तांचे पत्र

उत्तर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी 15 ऑक्टोबरच्या आधी फटके बंदीचा ठराव मंजूर करावा. २२ ऑक्टोबर पर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत.

राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा 

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणे झाले. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी