साईभक्तांसाठी खुशखबर; कोरोनामुळे खंडीत झालेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून सुरू

नाशिक
भरत जाधव
Updated Oct 10, 2021 | 14:29 IST

आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरू झाले आहे.

 Airlines in Shirdi which was disrupted due to corona, will resume operations from today
कोरोनामुळे खंडीत झालेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून सुरू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावं लागणार आहे.
  • राज्य सरकारने मंदिरे खुली केल्यानंतर विमानतळ चालू करणे गरजेचे होते.

मुंबई : आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरू झाले आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्लीहुन पहिले विमान शिर्डीत दाखल झाले. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना देखील झाले.  
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाऊनचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. अशातच कोरोना प्रादुर्भावात शिर्डी विमानतळावरील सेवा बंद करण्यात आली होती. पण आता ही सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरची सेवा आजपासून पुन्हा सुरू झाली. आज दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमधून साईभक्तांना घेऊन विमाने शिर्डी विमानतळावर उतरणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीहून, दुपारी अडीच वाजता हैदराबादहून तर दुपारी चार वाजता चेन्नईवरुन आलेल्या विमानाचे शिर्डी विमानतळावर लँडिंग होणार आहे. कोरोनामुळे खंडीत झालेली विमानसेवा पूर्ववत होत असल्याने साईभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे. 
शिर्डी विमानतळावर सुरुवातीला स्पाईसजेट, इंडिगो एअरलाइन्सची सेवा दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावं लागणार आहे.

राज्य सरकारने घटस्थापनेच्या दिवसापासून धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सध्या मंदिरांची दारे उघडली आहेत. मंदिरे सुरू झाल्याने भाविकांना आता शिर्डीतील साईबाबांचे दर्शनसुद्धा घेता येणार आहे. तर मंदिरे सुरू झाल्यानंतर विमानसेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यामुळे आता विमानतळ विकास प्राधिकरणाने हे विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी