धुळे: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील दोन दिवसापासून सर्व दूर तुफान पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. त्यातच धुळे (Dhule) जिल्ह्यात तर पूर (flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे उपनद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्याचा परिणाम अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आल्याने त्यातून सुमारे 22 हजार क्युसेस जलप्रवाह पांझरा नदीत सोडण्यात येत आहे. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असून, नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अधिक वाचा: Breaking: पुण्यात दुमजली इमारतीची भिंत कोसळली
याशिवाय पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 48 तासांत पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात गुरे- ढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत. असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
अधिक वाचा: मुख्यमंत्री शिंदेंनी केल्या दोन मोठ्या घोषणा
'सहस्त्रकुंड' धबधबा ओसंडून वाहतोय..
दुसरीकडे उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच तो सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना सहस्त्रकुंड धबधबा पाहण्याची आतुरता लागते. ३० ते ४० फुटावरून कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सहस्त्रकुंडाच्या बाजूस महादेवाचे मंदिर आहे. तसेच इथे मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पैनगंगा नदीचे वृंदावलेले पात्र व काला पाषाण यांच्या ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्वामुळे या ठिकाणाला वेगळेच महत्व आहे
अधिक वाचा:. मुंबईत पावसाचं तांडव, BMC नं Tweet करून दिली मोठी अपडेट
खवळलेल्या नदीचे सुंदर रूप पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून पर्यटक धाव घेत आहे. धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी प्रशासनाने उंच मनोरे तयार केले आहे. तेथून सेल्फी फोटो काढून पर्यटक आनंद घेत आहेत.
सहस्त्रकुंड धबधब्याच्या किनाऱ्यावर एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. या बागेमध्ये असणारी वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करून घेतात. त्यामुळे पर्यटकांना सहस्त्रकुंडने भुरळ घातली आहे.