नाशिक : केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना नाशिक जिल्ह्यातील कळवण नगरपंचायत निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलाअसल्याचं पहायला मिळाले आहे. नगरपंचायत निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. डॉ. भारती पवार यांचे दीर आमदार नितीन पवार यानी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चक्क ९ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्या असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच काही ठिकाणाहून धक्कादायक निकाल हाती आले आहेत.
दरम्यान, भारती पवार यांचं या मतदारसंघात मोठ वर्चस्व असून, त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम देखील केलं आहे. सध्या त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारती पवार यांना चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती. पवार यांना स्वत:च्या दिंडोरी मतदारसंघात नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले आहे. त्यासोबतच कळवण नगरपंचायतीतही त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरं जावे लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक जागा पटकावली आहे. आणि भारतीय जनता पार्टीला अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत. कळवणध्ये नगरपंचायतीच्या एकूण १७ जागा आहेत. त्यापैकी 9 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने ३ जागांवर, तर शिवसेना २ जागांवर विजयी झाली आहे. भारती पवार यांना हा धक्का त्यांचे दीर आमदार नितीन पवार यांच्यामुळे बसला असल्याची चर्चा आहे. कारण, नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून आणण्यासाठी जोर लावत रणनीती आखली होती.