नाशिकमध्ये १२ मे पासून कडक लॉकडाऊन, सर्व दुकाने राहणार बंद, काय आहेत नवीन नियम

नाशिक
Updated May 10, 2021 | 18:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

१२ मे २०२१ पासून नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

Nashik Lockdown
नाशिकमध्ये १२ मे पासून कडक लॉकडाऊन 
थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन
  • दहा दिवसांसाठी लॉकडाऊन
  • सर्व दुकाने राहणार बंद

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. नाशिकमध्येही कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. १२ मे २०२१ पासून नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

पालिका आयुक्तांनी दिली माहिती

'नाशिक जिल्हा आपत्ती निवारण समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात निर्बंध असतानाही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत किंवा घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत फक्त वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना बाहेर पडता येईल. १२ मे ला दुपारी १२ वाजेपासून ते २२ मे च्या रात्री १२ वाजेपर्यत नाशिकमधील लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. नागरिकांना किराणा आणि इतर सामानाच्या खरेदीसाठी परवा दुपारपर्यतचा वेळ उपलब्ध आहे,' अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दहा दिवसांचा लॉकडाऊन

नाशिकमधील लॉकडाऊन हा दहा दिवसांसाठी असणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत नाशिकमधील सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. वैद्यकीय सेवा, हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअरवगळता सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकांवर कडक निर्बंध असणार आहेत, त्यांना विनाकारण रस्त्यावर फिरता येणार नाही. नाशिकच्या मनपा आयुक्तांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीची आणि निर्णयाची माहिती दिली आहे. 

सर्वच दुकाने बंद राहणार

नाशिकमधील कडक लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. फक्त वैद्यकीय सेवा सुरू राहतील. नाशिक बाजार या मोबाईल अॅपवरून नाशिककरांना भाजीपाला, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याआधीच राज्याच्या विविध भागात निर्बंध लागू केलेले आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावायचे की नाही यावर आगामी काही दिवसात राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही कडक लॉकडाऊन लागू करण्यता आलेला आहे. देशाच्या अनेक भागात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभर थैमान घातलेले आहे. देशासमोर अभूतपूर्व संंकट निर्माण झाले आहे. सरकारसमोर कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक ती औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा देशात अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारने यासाठी विविध उपाययोजना केल्या असून आगामी काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा, वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन रुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यास कडक लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी