नाशिकमध्ये हळदीच्या दिवशी नवरदेवाची आत्महत्या

नाशिक
Updated Apr 20, 2019 | 12:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Groom suicide: हळदीच्या दिवशीच एका नवरदेवाने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात ही दु:खद घटना घडली आहे.

groom commits suicide day before marriage in Nashik
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

नाशिक: लग्न-कार्य म्हटलं तर ढोलताशांचा गजर, दागदागिन्यांची खरेदी, नवे कपडे, नातेवाईकांची लगबग, सर्वत्र आनंदाचं वातावरण आपल्याला पहायला मिळतं. असंच वातावरण नाशिकमधील निखिल देशमुख या तरुणाच्या लग्नासाठी होतं. मात्र, हळदीच्या दिवशी अशी काही बातमी समोर आली ज्यामुळे सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. ही बातमी म्हणजे नवरदेव असलेल्या निखिल देशमुख याने गळफास घेत आत्महत्या केल्याची. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाने आत्महत्या केल्याने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

३० वर्षीय निखिल देशमुख हा नाशिकमधील बळवंत नगर परिसरात राहतो. निखिलचं काही दिवसांपूर्वीच लग्न ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे निखिल शनिवारी म्हणजेच २० एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याने आपलं आयुष्य संपवलं. गुरूवारी रात्री निखिल देशमुख याने आपल्या बळवंतनगर परिसरातील फ्लॅटमध्ये गळफास घेतला. 

आत्महत्येचं कारण?

निखिल देशमुख याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. निखिलने लग्न होण्यापूर्वी असा टोकाचा निर्णय का घतला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.

निखिलचं लग्न असल्याने त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र मंडळी सर्वच आनंदात होते आणि सर्वत्र उस्ताहाचं वातावरण होतं. मात्र, निखिलने आत्महत्या केल्याची माहिती समजताच सर्वांना एक जोरदार धक्का बसला आहे. आर्थिक विवंचेतून निखिल देशमुख याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पती काळा म्हणून पेटवलं

तर, तिकडे उत्तरप्रदेशात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपला पती काळा असल्याने पत्नीने त्याला पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. पती गाढ झोपेत असताना पत्नीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोघांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी