नाशिक : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे ओव्हर फ्लो झाली असून, २४ पैकी १९ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील इतर धरणापेक्षा सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आठवडाभरात ३४ वरून ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठवडाभर पावसाचा धुव्वांधार वर्षाव झाल्याने एकूण उपयुक्त पाणीसाठाही ४३ टक्क्यांनी वाढून ८० टक्के झाला आहे.
जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असला तरी जून महिन्यात पावसाचा जोर कमीच होता. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होता. पाण्याची मागणी अधिक असल्याने धरणांतील पाणीसाठा कमी-कमी होत असतो. अगदी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. परंतु जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने स्थानिक पातळीवरच पाण्याची उपलब्धता झाली आहे.
रविवारी सकाळपासूनच पाऊस थांबला आहे. जिल्ह्यातील २४ पैकी नऊ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. म्हणजेच आजमितीस या धरणांमध्ये १०० टक्के पाणी उपलब्ध असून, या धरणांमधून पाण्याचा विसर्गदेखील सुरू आहे. गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड समूहातील वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.