Hanuman Chalisa : मशीदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा लावण्यास बंदी, नाशिक पोलिसांचे आदेश, भोंग्यावरही दिली प्रतिक्रिया

राज्यात आणि देशात मशीदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे. आता नाशिक पोलिसांनी यावरून एक आदेश जारी केला आहे. लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी दिली आहे. तसेच मशिदीच्या १०० मीटरच्या आत हनुमान चालीस लावण्यास परवानगी नाही

loudspeaker mosque
मश्जीद लाऊडस्पीकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात आणि देशात मशीदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे.
  • आता नाशिक पोलिसांनी यावरून एक आदेश जारी केला आहे.
  • लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल .

Hanuman Chalisa : नाशिक : राज्यात आणि देशात मशीदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे. आता नाशिक पोलिसांनी यावरून एक आदेश जारी केला आहे. लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा किंवा भजन लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी दिली आहे. तसेच मशिदीच्या १०० मीटरच्या आत हनुमान चालीस लावण्यास परवानगी नाही आणि अझानाच्या १५ मिनिटापूर्वी आणि १५ मिनिटानंतर हनुमान चालीसा लावण्यास बंदी असल्याचेही पांडे यांनी सांगितले. 

एएनआय या  वृत्तसंस्थेशी बोलताना पांडे यांनी ही माहिती दिली आहे. नाशिकमध्ये कायदा सुवव्यवस्था रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत लाऊडस्पीकर लावण्यासाठी त्यासंबंधित आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात असे आवाहनही पांडे यांनी केले आहे. ३ मे पर्यंत या आदेशाचे कोणी उल्लंघन केले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पांडे म्हणाले. 

 


संपूर्ण राज्यात लाऊडस्पीकरसाठी परवानगी होणार बंधनकारक?

राज्यात लाऊडस्पीकर आणि भोंग्याचा वाद संपवण्यासाठी नाशिकच्या धर्तीवर राज्यात निर्णय होऊ शकतो. पोलिसांकडून परवानगी घेतल्यानंतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावत येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज यासंबंधित पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. लवकरच राज्यात यासंबंधित मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. तसेच गृहमंत्री वळसे पाटील राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरांसंबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. 


राज ठाकरे यांचा अल्टिमेटम

राज्यातील मशींदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टीका केली होती, तर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. वर्षभरातील सणवार असेल तर लाऊडस्पीकर लावणे चुकीचे नाही असे राज ठाकरे म्हणाले परंतु वर्षभर भोग्यांवर अझान आणि बांग देणे चुकीचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही यावर टिपण्णी केली आहे मग राज्य सरकार यावर का भूमिका घेत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. असे असले तरी सध्या रमजान सुरू आहे, ३ मे रोजी ईद आहे त्यानंतरही जर भोंगे दिसलेच तर आम्ही हनुमाच चालीसा लावणार असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच मुस्लिम समाजाने मशीदींवर स्वतःहून हे भोंगे काढावे असे आवाहनही त्यांनी मुस्लिम समाजाला केले आहे. ३ मे पर्यंत मशीदींवरील सर्व भोंगे हटवावे असे अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी